मास्को : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे आदेश दिले आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी रशियन अधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यापासून ऐच्छिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी लस बनविण्यासाठी एक प्लांट सुरू करण्याच्या कार्यक्रमात ही घोषणा केली. यावेळी पुतीन म्हणाले, रशिया पुढील काही दिवसांत करोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ चे २० लाख डोस तयार करणार आहे. रशियाने गेल्या महिन्यात म्हटले होते की, ‘स्पुटिनिक व्ही’ लस चाचणीदरम्यान कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी ९२ टक्के प्रभावी ठरली आहे.
उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा म्हणाले की, डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे काम ऐच्छिक तत्वावर सुरू होऊ शकेल. पुढील आठवड्यापासून रशियामध्ये लसीकरण मोहिमेंतर्गत शिक्षक आणि आरोग्य सेवांशी संबंधित लोकांना लस दिली जाईल.
दरम्यान, युनायटेड किंगडमने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि यूरोपीय संघाच्या निर्णयाने फायझर आणि बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा युनायटेड किंगडम पश्चिमेकडील पहिला देश बनला आहे. ही लस पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये उपलब्ध होईल.
बुधवारी रशियामध्ये कोरोनाचे 25,345 नवे रुग्ण आढळले. रशिया हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कोरोना बाधित देश आहे. रशियात 2,347,401 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. कोरोनाच्या आतापर्यंत रशियामध्ये 41,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिका, भारत आणि ब्राझील या देशांनाही कोरोनाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे.