वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली. अमेरिकी सरकार व प्रशासनातील भारतीय वंशाचे, तसेच भारतीय प्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. ट्रम्प यांची कन्या इवांका हीदेखील दिवाळी समारंभात सहभागी झाली होती. समारंभाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी दीप प्रज्वलनही केले.अमेरिकेच्या विकासात भारतीयांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी या वेळी केला. स्वत: ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमधील दिवाळीची पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे आणि आमच्यासाठी दिवाळी हा जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताविषयी आणि भारतीयांविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिमानास्पद क्षण आहे.भारतीय वंशाचे नेते व प्रशासनातील अधिकारी यांच्यासह हा प्रकाशाचा सण साजरा करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला आहे. (वृत्तसंस्था)बुशपासून परंपरा सुरूव्हाइट हाउसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्याची परंपरा अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सुरू केली होती. त्यानंतरच्या अध्यक्षांनी ती कायम ठेवली. या आधी बराक ओबामा यांनीही व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली होती. त्या निमित्ताने ते अनेक भारतीयांना भेटलेही होते.‘मुबारक’ शब्दावरून टीकाभारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी संख्या असलेल्या कॅनडाचे तरुण पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी ओटावा शहरात भारतीय समाजासोबत दिवाळी साजरी केली. याचा फोटो शुभेच्छांसह टिष्ट्वटरवर टाकला. मात्र, यात ‘दिवाळी मुबारक’ असा शब्दप्रयोग केल्याबद्दल त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
व्हाइट हाउसमध्ये राष्ट्राध्यक्षांनी केली दिवाळी साजरी , ट्रम्पनी केले दीप प्रज्वलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 1:47 AM