इंग्लंड, दि. 7 - लेवेसमधील एका शाळेनं अजब फतवा काढला आहे. लेवेसमधल्या ईस्ट ससेक्स भागातील प्रायररी स्कूलमध्ये चक्क मुलींना स्कर्ट घालून शाळेत येण्यास शाळा प्रशासनानं मज्जाव केला आहे. इंग्लंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लिंग परिवर्तन करण्याचे प्रकार वाढल्यामुळे शाळेनं हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे, असं वृत्त इंडिपेन्डन्सं दिलं आहे. प्रायररी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ट्राऊजर घालून शाळेत येण्याचा नियम शाळा प्रशासनानं ठरवला आहे. प्रायररी स्कूलच्या मुख्याध्यापकांनी या नव्या नियमाचं समर्थन केलं आहे. ब-याचदा विद्यार्थी हे गणवेशाबाबत प्रश्न विचारत असतात. मुलींना वेगळा आणि मुलांना वेगळा गणवेश कशासाठी, असं प्रश्न विद्यार्थ्यांना पडत असल्यामुळे आम्ही 7 वर्षांपर्यंत गणवेशसक्ती केली आहे. तसेच लिंग परिवर्तन केलेल्या विद्यार्थ्यांची ओळख लपवण्यासाठीही हा नियम फायदेशीर ठरणार असल्याचंही प्रायररी स्कूलचे मुख्याध्यापक टोनी स्मिथ यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही 7 वर्षांपर्यंत गणवेशाची सक्ती केली आहे, मात्र त्यानंतरही 8 ते 11 वयोगटातील विद्यार्थ्यांनी नवा गणवेश परिधान केल्यास त्यांचं स्वागत असेल, असंही मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे.मात्र मुलींच्या पाल्यांनी शाळेच्या या नव्या नियमाला कडाडून विरोध केला आहे. मुलींच्या आईंनी शाळेच्या या अजब फतव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. माझी मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना या नव्या नियमामुळे भीती वाटत आहे. शाळा प्रशासन मुलींसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करत आहे, अशी भावनासुद्धा एका आईनं व्यक्त केली आहे. माझ्या मुलीनं मी लिंगानं मुलगी असल्याचं सांगितलं असून, त्याचा तिला गर्व आहे, असंही दुस-या मुलीच्या आईनं म्हटलं आहे. तसेच इंग्लंडमधल्या ब्राइटन कॉलेज, एक स्वतंत्र बोर्डिंग शाळा, खासगी शाळेनंही असा नियम केला होता. शाळेच्या बाहेर मुलांकडून विद्यार्थिंनीच्या होणा-या छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासाठी या शाळांनी एकच गणवेश केला होता.
विद्यार्थ्यांची ओळख लपवण्यासाठी एका शाळेनं मुलींना स्कर्ट घालण्यास केला मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 9:27 PM