एेजाॅल, दि.१०- म्यानमारमध्ये सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्राला कंटाळून भारतात येण्याच्या तयारीत असणा-या रोहिंग्यांना रोखण्यासाठी भारताने कडक पावले उचलली आहेत. एेजाॅल, सर्चिप आणि लुंगेई येथे आसाम रायफल्सच्या तीन तुकड्या तैनात केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली. एकाही रोहिंग्याला भारतात घुसता येऊ नये यासाठी मिझोरम आणि म्यानमार सीमेवर पहारा देण्यात येत आहे. आसाम रायफल्सच्या इतर पाच तुकड्या ही घुसखोरी रोखण्यासाठी आसाम, मणिपूर आणि नागालॅडमध्ये तैनात केल्याची माहिती या पोलिसाने दिली आहे.
म्यानमारमधील रोहिंग्याबहुल प्रांत मिझोरमपासून दूर असल्यामुळे ते मिझोरममध्ये प्रवेश करतील याबाबत शंकाच आहे, तसेच त्यांची संस्कृती, राहणी व इतर बाबीही मिझो लोकांपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत, असेही या अधिका-याने सांगितले. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून राखिन प्रांतातून रोहिंग्या बांगलादेशच्या दिशेने पलायन करत आहेत. पाच लाख रोहिंग्या याआधीच बांगलादेशात प्रवेश करुन कॅम्पांमध्ये राहात आहेत. बांगलादेशने या लोकांना यूएनच्या मदतीने औषधे, स्वच्छतेच्या सोयी व अन्न पुरवले आहे. अजूनही रोहिंग्यांनी नेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाणे सुरुच ठेवले आहे. कालच नेफ नदीत रोहिंग्यांची बोट उलटून १२ लोकांचे प्राण गेले होते. अशा प्रकारचे अपघात येथे वारंवार होत आहेत.
म्यानमारने मात्र रोहिंग्यांना परत सुरक्षित माघारी येण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन किंवा दिलासा दिलेला नाही. रोहिंग्या परत येऊ नयेत म्हणून त्यांच्य वाटेत सीमेवर भूसुरंगही म्यानमारने पेरले. याचा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत निषेध केला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भारतात जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असून रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारला पाठवण्याची मोहीम उघडण्यात येणार असल्याची माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी भूमिका घेतली आहे.