पाकिस्तानमध्ये महागाई पुन्हा एकदा वाढली आहे. टोमॅटोचे भाव २०० रुपये किलो झाले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील गरीब जनतेची चिंता वाढली आहे. बकरी ईदच्या निमित्ताने अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात, ज्यामध्ये टोमॅटो आवश्यक आहे. सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने आता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. एप्रिल महिन्यात टोमॅटोची ५०० रुपये किलोने विक्री झाली होती.
भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये आज ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. बकरी ईदच्या निमित्ताने चविष्ट पदार्थ तयार केले जातात, मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानमध्ये सणापूर्वीच महागाई शिगेला पोहोचते. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पेशावरमध्ये जिल्हा प्रशासनाने टोमॅटोचा कमाल भाव १०० रुपये प्रतिकिलो ठरवला असला तरी आता टोमॅटोची विक्री दुप्पट भावाने होत आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, टोमॅटोच्या दरात एका दिवसात १०० रुपयांनी वाढ झाली असून, जिल्ह्याच्या उपायुक्तांनी कलम १४४ अंतर्गत टोमॅटो जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घातली आहे. सरकारी सूचना केवळ सरकारी कागदपत्रांपुरत्याच मर्यादित राहिल्याने जमिनीवरची महागाई शिगेला पोहोचल्याचे मानले जात आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा किरकोळ भाव ५०० रुपये किलो झाला होता.
पाकिस्तानमध्ये अलीकडेच टॅक्स रिफॉर्म करण्यात आला आहे. मात्र त्याचा परिणाम महागाई रोखण्यासाठी झालेला नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूट (SDPI) चे कार्यकारी संचालक आबिद सुलेरी यांनी महागाई कमी करण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सरकारने बकरी ईदपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत.