इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी कोरोनापासून बचावासाठी लसीकरण केले. इस्रायलमध्ये सर्वात पहिली लस नेत्यानाहू यांना टोचण्यात आली असून इथून पुढे देशभरात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नेत्यानाहू यांना लस देतानाचे व्हिडिओ चित्रीकरण टेलिव्हीजनवर लाईव्ह दाखविण्यात आले होते. जगातील काही निवडक नेत्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे, त्यामध्ये नेत्यानाहू यांचा समावेश झाला आहे.
इस्रायलमध्ये आजपासून फ्रंट फूटवर काम करणाऱ्या म्हणजेच आरोग्य खात्याशी संबंधित व्यक्तींना लस टोचण्यास सुरुवात होत आहे. नर्सिंग होममधील स्टाफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने ही लस टोचण्यात येणार आहे. देशातील नागरिकांचा लसीकरणावरील विश्वास वाढावा आणि मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सर्वप्रथम लस टोचून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.