रियाध- लेबनॉनचे पंतप्रधान साद हारिरी सौदी अरेबियामधून फ्रान्समध्ये गेल्याचे एका वाहिनीने वृत्त दिले आहे. ही वृत्तवाहिनी हारिरी यांच्या कुटुंबाद्वारेच चालवली जाते. ४ नोव्हेंबर रोजी हारिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हारिरी आपल्या पत्नीसह रियाध विमानतळावरुन खासगी विमानाने गेले असे फ्युचर टीव्ही वाहिनीने वृत्त दिले आहे.
सौदी अरोबियाच्या भेटीवर आल्यावर साद हारिरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सर्व जगाला चकीत केले होते. लेबनॉन सरकारमध्ये हिजबोल्लाचा समावेश असल्याचा आरोप करत सौदी अरेबियानेही लेबनॉनवर टीका केली. सौदीने आपल्या नागरिकांना लेबनॉनमधून परत येण्याच्या सूचनाही दिल्या. तर सौदीने आपल्या पंतप्रधानांना नजरकैदेत ठेवले आहे असा आरोप करुन आमच्या पंतप्रधानांना परत द्या अशी मागणी लेबनॉनने केली होती. हारिरी यांनी ट्वीटरद्वारे हे खोटे असल्याचे सांगत आपण स्वतः राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.
लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर पत्रकार परिषदेत जर्मनीचे परराष्ट्रमंत्री सायमन गॅब्रिएल यांनी हारिरी यांच्या इच्छेविरुद्ध सौदी अरेबियाने त्यांना आपल्या देशात ठेवून घेतले असे विधान केले. त्यावर संतप्त सौदीने बर्लिनमधील आपल्या राजदुताला माघारी बोलवले असून जर्मनीच्या रियाधमधील दुताकडे निषेधाचा खलिता पाठवला आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रोन यांनी हारिरी यैंना फ्रान्समध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते, मात्र नंतर आपण त्यांना फ्रान्समध्ये आश्रय देण्यासाठी बोलावले नसून फक्त काही दिवसांसाठी राहण्यास बोलावले असे स्पष्ट केले. फ्रान्सनंतर हारिरी इतर काही अरब देशात जातील असे सांगण्यात येते.
सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिले आहेत. लेबनॉनमधील हिजबोल्ला संघटनेला इराणचे पाठबळ मिळत असल्याचा सौदी अरेबियाचा आरोप आहे. इराण सर्व प्रदेशात आपले बळ वाढवत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने पाठबळ दिल्यावर सौदीने ही भूमिका घेतली.
सौदीने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे आदेश दिल्यानंतर बाहरिन आणि कुवेतनेही आपल्या नागरिकांना माघारी येण्याच्या सूचना केल्या. "हिजबोल्ला जोपर्यंत लेबनॉन सरकारमध्ये आहे तोवर लेबनॉनला सौदी अरेबिया विरोधी देशच मानेल. हिजबोल्लाचा सरकारमध्ये समावेश म्हणजे सौदी अरेबियाविरोधात युद्ध पुकारल्यासारखेच आहे" असे मत सौदीचे आदेल अल-जुबेर यांनी व्यक्त केले होते.