व्हिएन्ना : ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहॅमर यांच्याशी फलदायी चर्चा केली. युक्रेन संघर्ष आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह जगातील चालू विवादावरही त्यांच्याशी तपशीलवार चर्चा केली. ही युद्धाची वेळ नाही, संवाद मुत्सद्देगिरीवर भर द्यावा, असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.
भारत-ऑस्ट्रिया मैत्री आगामी काळात अधिक घट्ट होईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि ऑस्ट्रियाने परस्पर सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी येत्या दशकांसाठी सहकार्याची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्याबाबत चर्चा केली, असे मोदी यांनी चान्सलर नेहॅमर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर माध्यमांना सांगितले.
युद्ध सुरू असताना समस्यांवर उपाय शोधता येत नाहीत, असे प्रतिपादन करून मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रिया हे दोन्ही मित्र देश संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भर देतात आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ देण्यास ते तयार आहेत. भारत आणि ऑस्ट्रिया हे दोघेही दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध करतात. दहशतवाद कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाही, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. ४० वर्षांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट आहे. याआधी १९८३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या देशाला भेट दिली होती. नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेत त्यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली.
‘वंदे मातरम्’ने स्वागत
फेडरल चॅन्सलरी येथे झालेल्या चर्चेपूर्वी मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. ऑस्ट्रियाच्या कलाकारांनी ‘वंदे मातरम्’ने मोदींचे स्वागत केले. गायक, वाद्यवृंदाचे नेतृत्व विजय उपाध्याय यांनी केले. ५७ वर्षीय उपाध्याय यांचा जन्म लखनौमध्ये झाला. १९९४ मध्ये ते व्हिएन्ना विद्यापीठाच्या संगीत विभागाचे संचालक झाले.
रशियासोबतच्या संबंधांबद्दल चिंता
वॉशिंग्टन : रशियासोबतच्या संबंधांबद्दल चिंता असूनही भारताला एक धोरणात्मक भागीदार म्हणून पाहणे आणि त्यांच्याशी मजबूत संवाद सुरू ठेवणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र जाहीरनाम्याचे पालन करणे आणि युक्रेनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व भारत रशियाला पटवून देईल, असा विश्वास पेंटागॉनचे प्रसिद्धी सचिव मेजर जनरल पॅट रायडर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले.