मॉस्को : रशियाचे भारताशी उत्तम मैत्रीसंबंध आहेत. विविध प्रसंगांमध्ये दोन्ही देशांनी परस्परांना पाठिंबा दिला असून, हे सहकार्य भविष्यातही कायम राहील, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. भारताचे व तेथील जनतेचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्र बाण्याचे परराष्ट्र धोरण राबवत आहेत, अशी पुतीन यांनी स्तुती केली.
वाल्दाई इंटरनॅशनल डिक्सशन क्लबने आयोजिलेल्या एका कार्यक्रमात पुतीन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, भारत व रशियामध्ये गेल्या काही दशकांपासून संरक्षण, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्येही उत्तम सहकार्य प्रस्थापित झाले आहे. भारताला जगात सर्वत्र आदराची वागणूक मिळत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व कारणीभूत आहे.
सध्याचा काळ युद्ध करण्याचा नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना महिनाभरापूर्वी सांगितले होते. रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धाचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्रांची यंत्रणा विकत घेण्याबाबत ऑक्टोबर २०१८ मध्ये करार केला होता. या कराराच्या वेळी अमेरिकेने भारतावर निर्बंध लादण्याचा इशारा दिला होता; पण भारताने त्याकडे लक्ष दिले नव्हते. (वृत्तसंस्था)
‘मोदी आहेत सच्चे देशभक्त’राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे देशभक्त आहेत. त्यांनी देशाचा विकास करण्यासाठी मेक इन इंडिया ही मोहीम हाती घेतली. त्यामुळे भारताची मोठी प्रगती होणार आहे. भारत हा केवळ जगातील सर्वात मोठा लोकशाही देशच नाही तर त्या देशाचा विकास दरही अभिमानास्पद आहे.
रशियन लष्करावर युक्रेनचे हल्लेकीव्ह : रशियाच्या लष्कराने खेरसन शहराच्या काही भागांवर कब्जा केला असून, तिथे युक्रेनच्या सैन्याने जोरदार हल्ले केले. खेरसनच्या काही भागात रशियाने नेमलेले अधिकारी मायदेशात पळून गेल्याचे वृत्त आहे. युक्रेनमधील डोनबास प्रांतावर संपूर्ण कब्जा करण्याचे रशियाचे प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. युक्रेन युद्धात अण्वस्त्रे वापरण्याचा रशियाचा इरादा नाही, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. युक्रेनला युद्धामध्ये जैविक अस्त्रे बनविण्यासाठी अमेरिका मदत करत असल्याचा आरोप रशियाने यापूर्वी केला होता.