"चिमुकली मुले मरतात, तेव्हा हृदय पिळवटून जाते"; रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदींचे उद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:45 AM2024-07-10T10:45:47+5:302024-07-10T10:45:59+5:30
पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी पुतिन यांच्या हस्ते रशियाच्या सर्वोच्च 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित करण्यात आले.
मॉस्को : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांच्या वर्षावात शांतता चर्चा यशस्वी होत नाही, कोणत्याही संघर्षावर युद्धातून तोडगा निघू शकत नाही. युद्धात निष्पाप मुलांचा मृत्यू होतो, ते हृदय पिळवटून टाकणारे आणि अत्यंत वेदनादायक असते,' असे खडे बोल सुनावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या भूमिकेचे मंगळवारी स्वागत केले.
पंतप्रधान मोदी यांना मंगळवारी पुतिन यांच्या हस्ते रशियाच्या सर्वोच्च 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल' पुरस्काराने अधिकृतपणे सन्मानित करण्यात आले. उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोदींना त्यांच्या अपवादात्मक सेवेसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोदींनी 'एक्स'वर पुरस्काराबद्दल आभार मानून तो भारतवासीयांना समर्पित केला. १६९८ मध्ये झार पीटर द ग्रेट यांनी स्थापित केलेला हा रशियाचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.
२२व्या शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये युक्रेन पार्श्वभूमीवर चर्चा झाली संघर्षाच्या
बॉम्ब, बंदुका अन् गोळ्यांमध्ये...
पंतप्रधान मोदींनी भारत शांततेच्या बाजूने उभा आहे आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी योगदान देण्यास तयार आहे, नवीन पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता खूप महत्त्वाची आहे. बॉम्ब, बंदुका आणि गोळ्यांमध्ये शांतता चर्चा यशस्वी होत नाही, अशी भूमिका मांडली.
भारतातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी रशियासोबतचे सहकार्य आणखी वाढावे, अशी आमची इच्छा आहे, दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा जनतेला खूप फायदा होईल, असे मोदी म्हणाले.
दहशतवादाबाबत पंतप्रधानांची चिंता
भारत जवळपास ४००८ वर्षांपासून दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करत आहे. मी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो.
गेल्या पाच वर्षांत जगाने अनेक आव्हानांचा सामना केला आहे, त्यातील पहिले आव्हान कोविड-१९चे होते आणि नंतर अनेक संघर्षाचे होते.' असे मोदी म्हणाले.