वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. लोकप्रियतेबाबत मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक आदी दिग्गज नेत्यांनाही मागे टाकले आहे.
जागतिक स्तरावरील नेत्यांच्या निर्णयांचे मूल्यमापन करणाऱ्या ‘मॉर्निंग कन्सल्ट’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका ट्वीटद्वारे दिली आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय, विश्वासार्ह नेत्यांमध्ये मोदी प्रथम क्रमांकावर, तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल लोपेझ हे दुसऱ्या स्थानावर आहेत. २२ ते २८ मार्च या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक देशातल्या प्रमुख नेत्याबद्दल तेथील नागरिकांची सलग सात दिवस मते आजमाविण्यात आली. त्यातून सरासरी काढून या सर्वेक्षणात प्रत्येक नेत्याला रेटिंग देण्यात आले आहे. दरवर्षी हे सर्वेक्षण घेण्यात येते. (वृत्तसंस्था)
जगातील सर्वाधिक लोकप्रिय दहा नेते
- पंतप्रधान नरेंद्र मोदी (भारत) ७६%
- अँद्रेज ओब्राडोर (मेक्सिको) ६१%
- अँथनी अल्बानीज (ऑस्ट्रेलिया) ५५%
- अलेन बर्सेट (स्वित्झर्लंड) ५३%
- लुईझ दा सिल्वा (ब्राझिल) ४९%
- जॉर्जिया मेलोनी (इटली) ४९%
- जो बायडेन (अमेरिका) ४१%
- अलेक्झांडर डी क्रो (बेल्जियम) ३९%
- जस्टिन ट्रुडो (कॅनडा) ३९%
- पेड्रो सांचेझ (स्पेन) ३८%
जो बायडेन सातव्या स्थानी
यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्यावर्षी ७८ टक्के रेटिंग होते. यंदाच्या वर्षी त्यात दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. या सर्वेक्षणात २२ देशांतील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल मते आजमाविण्यात आली होती. यात पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत.
द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष सर्वांत कमी
‘मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणात द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांना सर्वांत कमी रेटिंग मिळाले. शेवटच्या तीन क्रमांकावर झेकोस्लाेवाकियाचे पंतप्रधान पेत्र फिएला, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन, द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल हे आहेत.