नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय भेटींच्या मालिकेतील दुसरी बैठक अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत झाली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी करोनाच्या महामारीमध्ये अमेरिकेकडून मिळालेल्या सहकार्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. दोन्ही नेत्यांमध्ये सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये खाजगीत चर्चा झाली आणि नंतर शिष्टमंडळ स्तरावरील बैठकीला उपस्थिती लावली.
कमला हॅरिस म्हणाल्या की, भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. जर तुन्ही भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमेपलीकडील दहशतवादाबाबत पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शवली आणि भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरल्याचे मान्य केले. हॅरिस यांनी अशा दहशतवादी गटांच्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही सहमती दर्शवली.
पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. हॅरिस यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यांनी पाकिस्तानला या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यास सांगितले आहे जेणेकरून त्याचा अमेरिका आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही,” असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी ब्लॅकस्टोनच्या सीईओना भेटले-
पंतप्रधान मोदी आणि ब्लॅकस्टोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन श्वार्जमन यांच्यात चांगली बैठक झाली. ब्लॅकस्टोनची भारतातील गुंतवणूक आणि ती आणखी विस्तारित करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल श्वार्जमन बोलले.
भारतात ब्लॅकस्टोनच्या भागीदारीच्या आणखी विस्तारासाठी भरपूर वाव आहे आणि भारतात केलेल्या सुधारणांची तपशीलवार माहिती पीए मोदींनी दिली. भारताच्या क्षमतेबद्दल खूप आशावादी आहेत आणि भारत हा जगातील सर्वात वेगाने पुढे जाणाऱ्या देशांपैकी एक आहे, असं श्वार्जमन म्हणाले. भारताने केलेल्या सुधारणांचंही त्यांनी कौतुक केलं. जगातील गुंतवणुकीसाठी भारत ही आमची सर्वोत्तम बाजारपेठ आहे, असं ते म्हणाले.