वॉशिंग्टन - अमेरिकेतील मॅनहॅटन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक संकट ठरलेल्या दहशतवादाविरोधात एकत्रितपणे लढण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे. मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांवर ट्रक घुसवत दहशतवादी केला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून, 12 हून अधिक लोक जखमी आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बातचीत करत सांत्वन स्विकारलं. मोदींनी यावेळी दहशतवादाचा तीव्र निषेध केला असून, मृत आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना केली आहे. 'जागतिक संकट ठरलेल्या दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका आपला लढा यापुढे कायम ठेवतील यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं आहे', अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.
याआधी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत हल्ल्याचा निषेध केला होता. मृतांच्या परिवाराच्या आणि जखमींच्या दु:खात मी सहभागी आहे, असं ट्वीट मोदींनी केलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला होता. ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील हल्ला हा आजारी आणि माथेफिरू व्यक्तीकडून करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच, इसिस या दहशतवादी संघटनेला अमेरिकेत येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. 'आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही'', असं ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं.
अमेरिकेतील मॅनहॅटन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख 29 वर्षीय सैफुलो म्हणून झाली आहे. हल्ल्यानंतर सैफुलोने ट्रकजवळ एक कागद ठेवला होता, ज्यामध्ये त्याने इसिससोबत असलेली आपली निष्ठा जाहीर केली आहे. ट्रकजवळ सापडलेल्या या कागदामुळे सैफुला इसिसचा दहशतवादी असल्याचा संशय बळावला आहे. प्रत्यक्षदर्शींनी न्यूयॉर्क पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्यापुर्वी हल्लेखोर जोरजोराने 'अल्लाहु अकबर' म्हणून ओरडला होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हल्लेखोर जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एफबीआयकडे हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किना-यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचा-यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडले. या घटनेमुळे धावपळ उडाली असता येथील एका गाडीतून गोळीबार सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 9/11 स्मारकाजवळदेखील गोळीबार झाला, मात्र यामध्ये जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.