थिम्पू : भूतानने ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने शुक्रवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत. यापूर्वी मोदींना १२ हून अधिक देशांनी आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. मोदी यांनी भारत-भूतान संबंध वृद्धिंगत करण्यात दिलेले योगदान तसेच त्यांनी भूतान देश व तेथील लोकांच्या केलेल्या अतुलनीय सेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.भूतानचा ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ पुरस्कार मिळाल्यामुळे आपण भारावून गेलो आहोत. मी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित करतो, असे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो’ प्रदान केला. वांगचूक यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी ११४ व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात या सर्वोच्च नागरी पुरस्काराची घोषणा केली होती. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी दोन दिवसीय भूतान दौऱ्यादरम्यान हा पुरस्कार स्वीकारला. आतापर्यंत केवळ चार जणांना या पुरस्काराने सन्माानित करण्यात आले आहे.
- रेल्वेसेवा सुरू होणार
- उभय देशांदरम्यान रेल्वेसेवा सुरू करण्यासह विविध सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आल्या. यात ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ आणि कृषी क्षेत्राशी संबंधित करारांचा समावेश आहे. - पंतप्रधान मोदी व त्यांचे भूतानचे समपदस्थ शेरिंग तोबगे यांच्या उपस्थितीत येथे सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. पंतप्रधान मोदी यांनी अभूतपूर्व स्वागताबद्दल पंतप्रधान- तोबगे यांचे आभार मानले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
माझ्या मोठ्या भावाचे स्वागत
तत्पूर्वी, मोदींचे भूतानमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान तोबगे यांनी मोदींची गळाभेट घेत माझ्या मोठ्या भावाचे स्वागत आहे, असे म्हटले. भूतानी युवकांनी पारंपरिक भारतीय पोषाख घालून पंतप्रधान मोदींनी रचलेल्या गरबा गीतावर नृत्य सादर करत त्यांचे स्वागत केले. मोदींनी नृत्याच्या सादरीकरणाची प्रशंसा केली.