वॉशिंग्टन - अमेरिकेत 20 लाखहून अधिक भारतीय-अमेरिकन मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचे काम पाहत असलेल्या व्यवस्थापकांनी एका व्हिडिओच्या स्वरुपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या अहमदाबादेतील ऐतिहासिक भाषणांतील काही मुद्द्यांचा समावेश आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा मोदी आणि ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये मोठ्या जनसमुदायाला संबोधित केले होते. यावेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर आणि काही वरिष्ठ अधिकारीही आले होते. ‘ट्रम्प व्हिक्ट्री फायनांस कमिटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुइलफॉयल यांनी एका ट्विटमध्ये हा व्हिडिओ प्रसिद्ध करताना म्हटले होते, की ‘अमेरिकेचे भारतासोबत फार चांगले संबंध आहेत आणि आमच्या मोहिमेला भारतीय-अमेरिकन नागरिकांचे मोठे समर्थन आहे.’
प्रचार मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प जूनिअर यांचे भारतीय-अमेरिकन समुदायाच्या लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनीही हे ट्विट रिट्विट केले आहे. हा व्हिडिओ फार कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ‘फोर मोअर इअर्स’ नावाचे शीर्षक असलेला 107 सेकंदांचा हा व्हिडिओ मोदी आणि ट्रम्प यांच्या फुटेजने सुरू होतो. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी ह्यूस्टन येथील एनआरजी स्टेडिअमवर हे दोघेही हातात हात टाकून चालले होते. ते फुटेजही यात आहे.
'मोदी यांनी आपल्या भाषणात ट्रम्प यांची केली होती स्तुती' -यावेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या नेत्यांनी 50,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन लोकांना संबोधित केले होते. अमेरिकेत आपल्या हजारो समर्थकांमध्ये मोदी यांनी त्यावेळी केलेल्या भाषणात ट्रम्प यांची जबरदस्त स्तुती केली होती. ‘ट्रम्प व्हिक्ट्री इंडियन अमेरिकन फायनांस कमिटी’चे सह-अध्यक्ष अल मेसन यांनी या व्हिडिओची रूप-रेखा तयार केली आहे. मोदी भारतीय-अमेरिकन्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.
2015 मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आणि नंतर दोन वर्षांनी सिलिकॉन व्हॅली येथे त्यांची भाषणे ऐतिहासिक ठरली. मोदींच्या या भाषणांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ह्यूस्टन येथे त्यांच्या 'हाउडी मोदी' भाषणासाठी तब्बल 50,000 लोक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या -
ट्रम्प यांना पॉर्नस्टारला 33 लाख रुपये द्यावे लागणार; 'तो' सनसनाटी आरोप पडला महागात
CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!
CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!