ऑनलाइन टीम
फोर्टलेझा, दि. १५- ब्रिक्स संमेलनासाठी ब्राझीलमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनफींग यांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चांगली चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्राझीलला असून मंगळवारी संध्याकाळी ब्रिक्स देशांची बैठक होणार आहे. यापूर्वी मोदींनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी यांनी नरेंद्र मोदींच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भारत आणि चीन जेव्हा भेटतात तेव्हा संपूर्ण जग त्यांच्याकडे बघते असेही शी यांनी आवर्जून नमूद केले. या भेटीत चीनने मोदींना आशिया आणि प्रशांत देशांच्या शिखर संमेलनालाही आमंत्रीत केले.
दरम्यान, सहा आठवड्यांपूर्वी देशात मोदी सरकार आल्यावर भारत व चीन या देशांमधील ही चौथी उच्चस्तरीय बैठक होती. यापूर्वी चीनचे दूत वांग हे दिल्लीत आले होते. तर भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि सैन्यप्रमुख जनरल बिक्रम सिंह हे चीन दौ-यावर गेले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत शी यांनी सप्टेंबरमध्ये भारत दौ-यावर येण्याची तयारी दर्शवली. तसेच मोदींनाही चीन दौ-यावर येण्याचे निमंत्रण दिले.