नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदींनी जनकपूर येथील जानकी मंदिरामध्ये विशेष पूजा केली. या भेटीदरम्यान, मोदींनी जनकपूर-अयोध्या या बससेवेला हिरवा झेंडा दाखवत तिचे औपचारिक उदघाटन केले. त्यानंतर ते काठमांडू येथील बैठकांमध्ये सहभागी होतील. दरम्यान, जनकपूर येथे मोदींना पाहण्यासाठी नेपाळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तचे मोदींच्या जानकी मंदिर दौऱ्यादरम्यान नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली हेसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये काहीशी कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भारत आणि नेपाळ संबंध पुन्हा मधूर बनवण्यावर मोदींचा भर असेल. तसेच नेपाळमध्ये भारताच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजनांची तात्काळ सुरुवात करण्यावर मोदी जोर देणार आहेत.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, अयोध्या आणि जनकपूरचे पिढ्यान पिढ्यांचे अतूट नाते आहे. येथे एकादशीच्या दिवशी येथे येता आले हे मी माझे भाग्य समजतो. आता भारत आणि नेपाळ एकत्र येऊन दोन्ही देशांमध्ये रामायण सर्किट बनवण्याच्या दिशेने काम करतील. तसेच नेपाळचे पंतप्रधान काठमांडूहून येथे आले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो.