पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याचे अमेरिकेकडून कौतुक, व्हाईट हाऊसकडून निवेदन जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 01:27 PM2024-08-24T13:27:41+5:302024-08-24T13:30:09+5:30
PM Modi Ukraine Visit: मोदींचा युक्रेन दौरा हा संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे
PM Modi Ukraine Visit: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावर रशिया आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष होते. त्यांचा दौरा अशा वेळी झाला जेव्हा युक्रेनने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून कुर्स्कमधील रशियन भागांचा ताबा घेतला. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र होताना दिसले. मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर काही चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींच्या युक्रेन दौऱ्यासंदर्भात अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदींचा युक्रेन दौरा हा रशिया-युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
मोदी शुक्रवारी ट्रेनने युक्रेनला पोहोचले. १९९२ मध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाल्यानंतर युक्रेनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. या दौऱ्यावर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा संपर्क सल्लागार जॉन किर्बी म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा भक्कम सहकारी आहे. युक्रेनमधील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नात मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही देशाचे अमेरिका स्वागत करते. कीव शहर शांततापूर्ण होण्यासाठी हा दौरा चांगले योगदान देऊ शकते.
जॉन किर्बी म्हणाले की, युक्रेन संघर्षावरील कोणत्याही चर्चेसाठी युक्रेनला पुढाकार घ्यावा लागेल. युद्ध संपवण्यासाठी कोणताही इतर देश मदत करत असेल तर अमेरिका त्या देशाच्या प्रयत्नांचे कौतुक करेल. तसेच, युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांसाठी मदतही करेल. पण या मदतीचा अर्थ असा असेल की त्या देशालाही चर्चेत सहभागी व्हावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या द्विपक्षीय बैठकीत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले की, युक्रेनमधील संघर्ष संपवण्याचा एकमेव उपाय म्हणजे संवाद. भारत कधीही तटस्थ राहिला नाही, आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत. भारत शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात भारत आणि युक्रेनमध्ये चार करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.