नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेचा दौरा जात असून या दौऱ्यात ते अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांनी तीन वेळा ऑनलाइन चर्चा केली आहे. मात्र, पहिल्यांदाच त्यांची भेट होणार असून या भेटीत अफगाणिस्तान व तालिबान या विषयावर प्रामुख्याने चर्चा होईल.
अमेरिकेत गेल्यानंतर पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या शहरांना भेटी देणार आहेत. अफगाणिस्तानातील चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी अमेरिकेला भेट देऊन तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थित ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम केला होता. दरम्यान, या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री, एनएसएसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील जात आहे.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील. मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत.