नवी दिल्ली- 2018 साली जानेवारी महिन्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारताच्या भेटीवर येणार आहेत या भेटीमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यामधील आर्थिक व इतर संबंध अधिक दृढ होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत.यावर्षी जुलै महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. या तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याबाबत जगभरात आणि विशेषतः भारतीय राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्य़ा.
संयुक्त अरब अमिराती दौरा आणि पॅलेस्टाइन भेट एकत्र करण्याचे नियोजन साऊथ ब्लॉकतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेचे यजमान संयुक्त अरब अमिराती असून 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये ती भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट असेल. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत आहेत. अबूधाबीचे राजपुत्र शेख झायेद बिन अल नाह्यान यांनीही भारताला दोन वेळा भेट दिली आहे. त्यामध्ये 26 जानेवारी 2016 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भारतदौऱ्याचाही समावेश आहे.
जेरुसलेमचा मुद्दा आणि पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूतअमेरिकेने आणि विशेषतः डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या वर्षी डिसेंबर महिन्यात नव्या वादाला जन्म दिला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देऊन मध्यपुर्वेत नव्या अशांततेचे वादळ उठले. मात्र भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या बाजूने मतदान केले नाही. या मुद्द्यावर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील. तर रावळपिंडीत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पॅलेस्टाइनचे राजदूत वालिद अबू अली कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात सहभागी झाले होते. याबाबत भारत पॅलेस्टाइन सरकारकडे रितसर नाराजी व्यक्त करणार असून, पॅलेस्टाइनच्या भारतातील राजदुताकडेही याचा जाब विचारला जाणार आहे.