डाव्होस - जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच ‘इंजिन’ आहे, असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 130 सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ डाव्होसला (स्वित्झर्लंड) येथे दाखल झाले आहे. आज पंतप्रधान मोदी त्यामध्ये भारताची आर्थिक भूमिका मांडतील. जागतिक आर्थिक फोरमची (डब्ल्यूइएफ) 48 वी बैठक आल्प्स गिरीशिखरांच्या कुशीत वसलेल्या डाव्होसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे. पाच दिवस चालणा-या या परिषदेत पंतप्रधान आज आपला विषय मांडतील. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा व दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत करण्यासंदर्भातही चर्चा केली. दरम्यान, डब्ल्यूइएफच्या परिषदेसाठी जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एच.डी. देवेगौडा यांच्यानंतरचे पहिलेच पंतप्रधान आहेत.पंतप्रधान मोदी यांनी या भेटीसंदर्भातील ट्विटदेखील केली आहे. ''डाव्होसमध्ये पोहोचल्यानंतर मी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्यासोबत संवाद साधला. आम्ही द्विपक्षीय सहकार्याच्या शक्यतांचा आढावा घेतला व संबंध अधिक बळकट करण्याबद्दल चर्चा केली'', असे ट्विट मोदींनी केले आहे.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी काही जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांचीही भेटे घेतील. मोदी हे डाव्होसमध्ये जागतिक आर्थिक फोरमच्या कार्यक्रमात भाषणदेखील देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर भारतीय अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि आपल्या धोरणांबाबत येथे माहिती मांडणार आहेत. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठकीचा पंतप्रधान मोदींचा नियोजित कार्यक्रम आहे.
दरम्यान, आज होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहीम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख आणि उद्योजांकसह जगभरातील 3 हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही सहभागी होणार आहेत. मात्र मोदी व ट्रम्प हे वेगवेगळ्या दिवशी डाव्होसमध्ये असल्याने त्यंची भेट होणार नाही. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासीही दाखल होणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत कुठलिही बैठक होणार नाही, असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.