सियोल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियाच्या उद्योजकांना भारतातील गुंतवणुकीच्या संधी सांगताना मोठी भविष्यवाणी केली आहे. लवकरच भारतीय अर्थव्यवस्था दुप्पटीने वाढून 5 लाख कोटी डॉलर होणार असल्याचे मोदी म्हणाले. भारताची अर्थव्यवस्था मजबूत असून हा देश संधी निर्माण करणारा देश आहे. मोदी दोन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून गुरुवारी ते दक्षिण कोरियाच्या राजधानी सियोलमध्ये पोहोचले आहेत.
भारत कोरिया व्यापार सिम्पोजियमला त्यांनी संबोधित केले. यावेळी कोरियातील उद्योजक उपस्थित होते. मोदी म्हणाले, जगातील कोणतीही अर्थव्यवस्था दरवर्षी 7 टक्क्यांनी वाढलेली नाही. ह्युंदाई, सॅमसंग आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्ससह 600 पेक्षा अधिक कोरियाई कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे. आम्ही अन्य कंपन्यांनाही गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण देत आहोत.
कार उत्पादन करणारी आणखी एक कंपनी किया या गुतवणूकदार कंपन्यांमध्ये सहभागी होणार आहे. उद्योजका, त्यांच्या अधिकाऱ्यांना भारतात येणे-जाणे सोईस्कर व्हावे यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कोरियाई लोकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची सोय उपलब्ध केली आहे. आमची अर्थव्यवस्था मजबूत आहे. लवकरच देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर होणार आहे. त्यादिशेने तयारीही सुरु आहे, असे मोदी यांनी सांगितले.