ऑनलाइन लोकमत
शियान, दि. १४ - चीनसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या इराद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी चीनमध्ये दाखल झाले. शियान विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शानदार स्वागत करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हेदेखील चीनमध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून परदेश दौ-यांचा धडाका लावणारे नरेंद्र मोदी आता तीन देशांच्या दौ-यावर आहेत. पहिल्या टप्प्यात मोदी तीन दिवस चीनचा दौरा करतील. यानुसार गुरुवारी सकाळी मोदी चीनमध्ये दाखल झाले. शियानमधील रस्त्यांवर भारत - चीनच्या मैत्रीची माहिती देणारे विविध पोस्टर्स झळकत आहेत. विमानतळावर शियान प्रांतातील पारंपारिक नृत्याने मोदींचे स्वागत करण्यात आले. शियानमध्ये मोदींनी युद्ध स्मारकाला भेट दिली. शियान हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे मूळ गाव आहे. आज दुपारी मोदी शी जिनपिंग यांची भेट घेतील. या दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. चीन दौ-यानंतर मोदी मंगोलिया व दक्षिण कोरिया या देशांचाही दौरा करतील.