ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ जूनला अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये भाषण करु शकतात. अमेरिकन हाऊसचे स्पीकर पॉल रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकन काँग्रेसमध्ये भाषण करण्यासाठी निमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी जून महिन्यात अमेरिकेच्या दौ-यावर जाणार आहेत.
पंतप्रधान कार्यालय किंवा व्हाईट हाऊसकडून अजून या दौ-याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जगातील सर्वात मोठया लोकशाही देशातून निवडून आलेल्या नेत्याचे भाषण ऐकणे ही एक विशेष संधी आहे. मुल्यांची जोपासना तसेच समृद्धता, उन्नतीसाठी दोन्ही देश एकत्र मिळून कसे काम करु शकतात याविषयी मोदीच्या भाषणातून मार्गदर्शन मिळेल असे रायन यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले.
भारत आणि अमेरिकेची मैत्री ही जगातील एका महत्वाच्या भागातील स्थैर्याचा आधारस्तंभ आहे असे रायन यांनी सांगितले. मोदींच्या अमेरिका दौ-यातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी अमेरिकन अधिका-यांची भेट घेऊन चर्चा केली.
सत्तेत आल्यानंतर मोदींचा हा चौथा अमेरिकेचा दौरा आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सत्राला संबोधित करणारे ते पाचवे भारतीय पंतप्रधान आहेत. मोदींच्या अमेरिका दौ-याच्या काळात अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असेल.