ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 24 - नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. संसदेत त्यांचा सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला होता. त्याला उत्तर देण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. के. पी. ओली यांनी राष्ट्रपतींकडे स्वतःच्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींना नेपाळमध्ये कलम 305 लागू करण्याची मागणी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच ओली यांच्या सरकारला पाठिंबा देणा-या माओवादी पक्षानं त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर ओली यांचं सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे नेपाळी काँग्रेस आणि सीपीएमनं ओली यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला. मात्र हा अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच के. पी. ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात माओवादी पार्टीनं सरकारमध्ये सहभाग घेतला होता. मधेशी जनाधिकार फोरम(डेमोक्रटिक) यांनीही युती तोडल्याची घोषणा केली आहे. दोन्ही पक्षांनी विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. 1990मधला रिपब्लिकन संविधान स्वीकारल्यानंतर नेपाळ संकटांच्या कचाट्यात सापडला होता. देशातल्या दक्षिणेकडच्या अल्पसंख्याक मधेशींनी या संविधानाला विरोधा केला होता. त्यानंतर ओली यांनी मधेशींच्या घरांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच वेळी ओली यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय माओवादी पक्षानं घेतला होता. पंतप्रधान ओली हे खूपच अहंकारी आणि आत्मकेंद्रित व्यक्ती असल्याची टीकाही यावेळी माओवादी पक्षाचे प्रमुख प्रचंड यांनी केली आहे. त्यांच्या या अहंकारी वृत्तीमुळेच त्यांच्यासोबत काम करणे आमच्यासाठी कठीण झाल्याचे प्रचंड यांनी सांगितले आहे.