काठमांडू- बिमस्टेक बैठकीसाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी शेजारच्या नेपाळमध्ये पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांमधील हा त्यांचा चौथा दौरा आहे. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशनची चौथी शिखर परिषद येथे होत आहे.नेपाळमध्ये पोहोचल्यावर मोदी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली, त्याचवेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट त्यांनी घेतली. यानंतर बिमस्टेक परिषदेचे उद्घाटन होईल आणि 31 ऑगस्ट म्हणजे उद्या संमेलन संपेल.
संमेलनानंतर संयुक्त घोषणापत्रही जाहीर करण्यात येईल. बंगालच्या उपसागराजवळचे सात देश या संघटनेचे सदस्य आहेत. त्यात बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. या सात देशांची लोकसंख्या 1.5 अब्ज इतकी आबे. जगातील एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के लोकसंख्या या सात देशांमध्ये राहाते. तसेच सर्व देशांची एकूण जीडीपी 2500 अब्ज डॉलर इतकी आहे. बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रातील दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्याचे वातावरण वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट्य आहे.अॅक्ट इस्ट पॉलिसी आणि नेबरहूड फर्स्ट पॉलिसी या भारताच्या नव्या योजनांमुळे भारतासाठी बिमस्टेक अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन वर्षांपूर्वी गोव्यामध्ये बिमस्टेकचे आयोजन करण्यात आले होते. त्य़ानंतर आता काठमांडूमध्ये बिमस्टेकचे आयोजन करण्यात आले आहे.