Prince Harry vs UK Government Court Case : इंग्लंडचे प्रिन्स हॅरी यांना नुकताच एका प्रकरणात न्यायालयाकडून झटका बसला. यूके सरकारविरोधात सुरू असलेल्या खटल्यात त्यांच्या विरोधात निकाल लागला. ड्यूक ऑफ ससेक्सला ब्रिटीश सरकारच्या विरोधात कोर्टात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रिन्स हॅरी यांनी यूके दौऱ्यादरम्यान त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेची पातळी बदलण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांच्या पोलिस संरक्षणात बदल अयोग्यरित्या करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण सुरक्षा धोक्यांचा सामना करावा लागला. मात्र, लंडन न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. राजघराण्यातील कार्यकारी सदस्याचा दर्जा सोडून अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रिन्स हॅरी यांच्याबाबत ब्रिटिश सरकारचा निर्णय चुकीचा नाही, असे न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटले.
काय प्रकरण आहे?
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जेव्हा प्रिन्स हॅरी राजघराण्यापासून दूर गेले आणि अमेरिकेत स्थायिक झाले, तेव्हा त्यांना राजघराण्याला दिलेले पोलीस संरक्षण दिले गेले नाही. त्याऐवजी, यूकेमधील इतर हाय-प्रोफाइल अभ्यागतांप्रमाणेच त्यांच्या सुरक्षेचा निर्णय विविध घटनांच्या व सोहळ्यांच्या व्याप्तीच्या आधारावर घेण्यात आला. न्यायालयाने राजघराण्यातील आणि 'रेव्हेक' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इतर उच्च-प्रोफाइल सार्वजनिक व्यक्तींच्या सुरक्षेवर देखरेख करणाऱ्या समितीचे निर्णय कायम ठेवले. या समितीमध्ये गृह कार्यालय, महानगर पोलीस आणि राजघराण्यातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
निर्णयात न्यायाधीशांनी काय निरीक्षण नोंदवले?
फेब्रुवारी 2020 मध्ये प्रिन्स हॅरीची सुरक्षा बदलण्यात आली. त्या निर्णयात काहीही बेकायदेशीर किंवा अवास्तव नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले आणि 'प्रक्रियात्मक त्रुटी' असती तरीही त्याचा निकाल बदलला नसता असेही म्हटले. यापूर्वीच्या न्यायालयाच्या निर्णयाने प्रिन्स हॅरीची ब्रिटनमधील पोलिस संरक्षणासाठी वैयक्तिक आर्थिक देय देण्याची विनंती नाकारली होती.
प्रिन्स हॅरी नुकतेच यूकेला आले होते
बीबीसीच्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी अलीकडेच त्यांचे वडील किंग चार्ल्स यांच्यासोबत ४५ मिनिटांच्या भेटीसाठी अमेरिकेतून यूकेला आले होते. किंग चार्ल्स कॅन्सरने त्रस्त आहेत. हॅरी आणि त्याची पत्नी मेघन, डचेस ऑफ ससेक्स कॅलिफोर्नियामध्ये राहतात. हॅरी आणि मेघन २०१६ मध्ये भेटले आणि २०१८ मध्ये लग्न केले. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी वरिष्ठ राजेशाही पदाचा राजीनामा दिला.