ऑनलाइन लोकमत
बैरूत, दि. २७ - लेबेनॉनच्या पोलीस अधिका-यांनी बैरूत विमानतळावरील आत्तापर्यंतची सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला असून यामध्ये सौदी अरेबियाचा प्रिन्स अब्देल अब्दुलअझिझ याच्यासह चारजणांना अटक केली आहे. दोन टन कॅप्टागॉनच्या गोळ्या आणि कोकेनची सौदी अरेबियात तस्करी करण्याचा हे पाचजण प्रयत्न करत होते असे वृत्त अल झझीराने दिले आहे.
बैरूत आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. ड्रग्जचा हा साठा खोक्यांमध्ये भरण्यात आला होता आणि खासगी विमानाने तो सौदी अरेबियाला रवाना करण्यात येणार होता. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार मध्यपूर्वेत अँफेटामाइन या ड्रगचा वापर वाढला असून, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि सीरिया या देशांमध्ये विशेष करून तस्करी होत आहे.