कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारांना यापुढे जादा सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी ४00 कोटी रुपयांचा एका प्रकल्प तपार करण्यात आला असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल. या प्रकल्पाचा भाग म्हणून सिंध प्रांतातील सर्वच धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठीच तयार करण्यात आला आहे, अशी माहिती सिंध प्रांतातील गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. पाकिस्तान पीपल्स पाटीर्चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-जरादरी यांनी दिलेल्या सूचनांनुसार या प्रकल्पाची तयारी करण्यात आली आहे. हैदराबाद, लारकाना तसेच अन्य ठिकाणी असलेल्या हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिंध प्रांतात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची एकूण १२५३ धार्मिक स्थळे आहे. त्यात हिंदुंची ७0३ मंदिरे, ५२३ चर्च आहेत. या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी एकूण २३00 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती वृत्तवाहिनीने दिली आहे. (वृत्तसंस्था)
सिंध प्रांतातील मंदिरे, चर्च यांच्या सुरक्षेला प्राधान्य
By admin | Published: October 22, 2016 1:10 AM