ऑनलाइन लोकमत
तेहरान, दि. ३ - पुरुषांचा व्हॉलीबॉलचा सामना बघितल्याने तेहरानमध्ये एका ब्रिटीश वंशाच्या तरुणीला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त असून ब्रिटननेही त्या तरुणीला तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी इराणकडे केली आहे.
तेहरानमध्ये महिलांनी पुरुषांचे व्हॉलीबॉल सामने बघू नये असा अजब नियम आहे. याचा विरोध दर्शवण्यासाठी मूळची ब्रिटीश पण सध्या इराणमध्ये राहणारी गॉनचे गवामी ही २५ वर्षाची तरुणी व अन्य काही महिला २० जूनरोजी व्हॉलीबॉल सामना बघायला गेल्या. यानंतर पोलिसांनी सर्व महिलांना तिथून बाहेर काढले. काही दिवसांनी गवामीला पोलिसांनी अटक केली व तिला तुरुंगात डांबले. गवामी ही स्वतः वकिलही आहे. तेहरानमधील न्यायालयाने नुकताच गवामीविषयी निकाल दिला असून यात तिला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी यंत्रणेविरोधात काम केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
गवामीच्या शिक्षेविरोधात इराणमधील महिला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. गवामीला तुरुंगातून सोडून द्यावे अन्यथा युरोपियन महासंघामध्ये इराणच्या प्रतिमेला धक्का बसेल असे डेव्हीड कॅमेरुन यांनी म्हटले आहे. तर इराणने या वृत्ताचे खंडन केले. गवामीला अन्य कारणांसाठी शिक्षा झाल्याचे इराणमधील अधिका-यांचे म्हणणे आहे. मात्र शिक्षेचे कारण काय याचे उत्तर देणे त्यांनी टाळले आहे.