वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ३० एप्रिल रोजी व्हाईट हाऊसमध्ये दिलेल्या अखेरच्या रात्रीभोजाला अभिनेत्री प्रियंका चोप्रासह हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. ही मेजवानी ओबामा यांनी आपल्या मिश्किील भाषणाने गाजविली. त्यांनी व्हाईट हाऊसमधील घडामोडींचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना चिमटे घेतले. स्वत:वर काही विनोदी शेरबाजी केली. राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत सर्वात समोर असलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, हिलरी क्लिंटन, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन उमेदवारांची तसेच संभाव्य अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीही टर उडविली. विशेषत: त्यांनी ट्रम्प यांना लक्ष्य बनविले.रिपब्लिकन पक्षाची व्यवस्था अविश्वसनीय असली तरी ट्रम्प हेच संभाव्य उमेदवार राहातील असे त्यांनी उपरोधिकपणे म्हटले. ट्रम्प यांच्याकडे राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी विदेशधोरणाचा अनुभव नाही असे म्हटले जात असले तरी त्यांनी जगभरातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मग मिस स्वीडन, मिस अर्जेंटिना असो की मिस अझरबैजान, असा टोलाही त्यांनी मारला. ओबामांच्या कारकीर्दीत विदेशमंत्री राहिलेल्या हिलरी क्लिंटन यांनी गोल्डमॅन सॅक येथे दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा मिश्किलतेचा परिचय दिला. तेथील भाषणासाठी हिलरी यांना मोठी रक्कम देण्यात आल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना ५४ वर्षीय ओबामा म्हणाले की,येथे माझ्या आठव्या आणि अखेरच्या भाषणासाठी आपण एकत्र आला आहात. गोल्डमॅन सॅक येथे भाषणासाठी मला निमंत्रण दिले गेले असते तर सर्व काही चांगले झाले असते, त्यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून आणि हसून दाद दिली. (वृत्तसंस्था)
ओबामांच्या रात्रीभोजला प्रियंका चोप्राची हजेरी
By admin | Published: May 02, 2016 1:51 AM