काठमांडू : नेपाळमधील सीपीएन-यूएमएल पक्षाचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांची रविवारी चौथ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. ते चीन समर्थक मानले जातात. सोमवारी ११ वाजता राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत शीतल निवास येथे ओली यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
ओली (७२) यांनी शुक्रवारी विश्वासदर्शक ठराव गमावलेल्या पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांची जागा घेतली. यानंतर राज्यघटनेच्या कलम ७६ (२) नुसार नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली.
अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी ओली यांची सीपीएन-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट (सीपीएन-यूएमएल) आणि नेपाळी काँग्रेस युती सरकारचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने ओली पंतप्रधान झाले.
शुक्रवारी रात्री उशिरा ओली यांनी नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि प्रतिनिधीगृहाच्या १६५ सदस्यांच्या स्वाक्षरीचे समर्थन पत्र सादर केले. त्यावर त्यांच्या पक्षाच्या ७७ सदस्यांनी आणि नेपाळी काँग्रेसच्या ८८ सदस्यांनी स्वाक्षरी केली. शुक्रवारी बहुमत चाचणीदरम्यान सीपीएन-माओवादी पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.
सात कलमी करार...
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा आणि सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांनी नवीन आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सात कलमी करारावर स्वाक्षरी केली.
पंतप्रधानांचा उर्वरित कार्यकाळ त्यांच्यामध्ये आळीपाळीने वाटून घेतला जाईल. करारानुसार, पहिल्या टप्प्यात ओली १८ महिन्यांसाठी पंतप्रधान होतील.