नवी दिल्ली- 12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअरयेथे होत असलेल्या खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला आहे. याआधीही भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणी इंग्लंडकडे केली आहे. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल असे फुटिरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दंमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी त्याची संभावना केली आहे. हे प्रकरण पुन्हा इंग्लंड सरकारकडे लेखी व प्रत्यक्ष भेटून मांडण्यात येईल असेही कुमार यांनी स्पष्ट केले. ही निदर्शने हिंसा आणि द्वेषाला खतपाणी देण्यासाठी होणार असल्याचेही कुमार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करुन इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत असे कुमार यांनी म्हटले आहे. याआधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करुन निदर्शनांना परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र इंग्लंड सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून निदर्शने करण्याचा इंग्लंडच्या नागरिकांना अधिकार आहे असे उत्तर दिले होते. यावर भारताचे समाधान झालेले नाही.खलिस्तानच्या निर्मितीसाठी जनमताची चाचणी घेण्यात यावी यासाठी अमेरिकेतील सीख फॉर जस्टीस संस्थेने ही रॅली आयोजित केली आहे. त्यांना पाकिस्तानातील काही संस्थांकडूनही पाठिंबा मिळालेला आहे.सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे.80 च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा जपून कायम धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.