इस्रायलने गाझामध्ये कहर केला आहे. गाझावर सतत हल्ले करत आहे. रुग्णालयाचं देखील मोठं नुकसान होत आहे. इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान गाझातील सर्वात मोठं रुग्णालय अल शिफा येथील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 22 रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांत रुग्णालयात 55 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे. रुग्णालयाचे डायरेक्टर मुहम्मद अबू सल्मिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल शिफा रुग्णालयात अजूनही 7000 हून अधिक लोक अडकले आहेत.
रूग्ण, मेडिकल स्टाफ आणि शेल्टर होममध्ये राहणाऱ्या अनेक लोकांचा यामध्ये समावेश आहे. अल शिफा हॉस्पिटलच्या आत एक बोगदा असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. त्यामुळे इस्रायली लष्कर या रुग्णालयाला लक्ष्य करत आहे. इस्त्रायली लष्कराने अनेक दिवसांपासून येथे कारवाई केली आहे. अलशिफा हॉस्पिटल हे हमासचे मुख्यालय असल्याचं इस्रायली लष्कराचं म्हणणं आहे.
अल शिफा रुग्णालयातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे, तसेच हमासचा एक पिकअप ट्रकही येथे सापडला आहे. हमासने हॉस्पिटलमध्ये एके-47, आरपीजी, ग्रेनेड आणि अनेक शस्त्रे लपवून ठेवल्याचा दावाही लष्कराने केला. मात्र, लष्कराच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हमासने इस्त्रायली ओलीस येथे लपविल्याचा दावाही आहे.
1200 हजारांहून अधिक मृत्यू
हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासने इस्रायलवर 5 हजार रॉकेट डागले होते. या काळात 1400 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इस्रायल सातत्याने हवाई हल्ले आणि जमिनीवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये गाझातील 12000 लोक मारले गेले आहेत. या हल्ल्यांमध्ये गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. येथून लाखो लोकांनी स्थलांतर केलं आहे.