लंडन : इंग्लडमधील ८०० वर्षांचा इतिहास असलेले प्रतिष्ठित केंब्रिज विद्यापीठ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा न घेण्याच्या विचारात आहे. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर खूपच वाईट झाल्यामुळे ही परीक्षा आता लॅपटॉप किंवा आयपॅडवर घेतली जाऊ शकते.विद्यार्थी लॅपटॉपवर फारच विसंबून राहत असल्यामुळे, त्यांचे हस्ताक्षर फारच दुर्बोध व सहज वाचता न येणारे झाले आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले. विद्यार्थ्यांकडून वर्गांत टिपणे काढून घेण्यासाठी लॅपटॉपचा वापर वाढत असल्यामुळे, ही आठ शतकांची लेखी परीक्षेची परंपरा आता निरोप घेणार आहे.विद्यापीठातील इतिहास विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. साराह पिअरसाल म्हणाल्या की, ‘आताच्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या हातातून लिहिण्याची कला हरवली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवसभरात अनेक तास लिहायचे, परंतु आता ते परीक्षेशिवाय इतर वेळी प्रत्यक्षात काहीही लिहीत नाहीत. माझ्या विभागापुरते बोलायचे, तर हाताने लिहिण्याच्या घटत्या प्रमाणाची आम्हाला अनेक वर्षांपासून काळजी वाटत आहे. लिहिण्याचे प्रमाण घसरतच जात आहे.’ ‘विद्यार्थी आणि परीक्षा घेणारे अशा दोघांसाठीही त्यांचे हस्ताक्षर वाचणे कठीण व अधिक कठीण झाले आहे,’ असे साराह म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
हस्ताक्षराची समस्या : आठ शतकांची परंपरा येणार संपुष्टात, केंब्रिज विद्यापीठ लेखी नव्हे; लॅपटॉपवर घेणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:37 AM