ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.1-
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी होताना दिसत आहे. अमेरिकेनंतर आता ब्रिटीश संसदेनेही पाकिस्तानला 'दहशतवादी राष्ट्र' घोषित करण्यासाठी पाऊल टाकले आहे. शुक्रवारी यासंदर्भातील एक याचिकादेखील ब्रिटनकडून दाखल करण्यात आली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना फक्त आश्रय देत नाही तर आर्थिक मदतही पुरवतो. पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जगातील दहशतवाद संपवण्यात अडसर निर्माण होत आहे, अशा आशयाची याचिका ब्रिटनने दाखल केली आहे.
दहशतवाद्यांना संरक्षण देण्याच्या पाकिस्तान सरकारच्या धोरणाचा ब्रिटीश सरकार तीव्र निषेध करतो, असे शीर्षक असलेली याचिका ब्रिटीश सरकारने आणि संसदेने आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. अमेरिकेने ठार केलेला दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानात लपला होता. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे घोषित दहशतवादी संघटनांना पाकिस्तान नेहमी पोसत आला आहे, असे देखील या याचिकेत म्हटले गेले आहे.
अमेरिकेतील 9/11 हल्ला, भारतातील मुंबई, संसदेवरील हल्ला, आणि काश्मीरमधील पसरवलेला दहशतवाद, या सर्व प्रकरणात दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांची मदत मिळाली आहे, या बाबी प्रामुख्याने याचिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. जॉर्ज टाऊन विद्यापीठातील प्राध्यापक डॅनियल बेमेन यांनी तर, 'पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा जगातील सर्वात मोठा देश' असल्याचे म्हटले आहे.
ब्रिटीश संसदेत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी याचिकाकर्ते खासदारांनी केली आहे. यासाठी सुमारे एक लाख लोकांची सही आवश्यक आहे. आतापर्यंत 1 हजार 896 लोकांनी सही केलेली आहे.