Canada Attack on Hindu :कॅनडात खलिस्तानी समर्थकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. ते आता उघडपणे भारताच्या विरोधात घोषणा देत आहेत, हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले करत आहेत. ताजी घटना रविवारी(दि.3) ब्रॅम्प्टनमध्ये घडली. येथील एका हिंदूमंदिरात खलिस्तान्यांनी अनेक हिंदूंवर हल्ला चढवला. या घटनेविरोधात सध्या कॅनडासह भारतामध्येही संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या घटनेनंतर कॅनडातील हिंदू समाज एकवटला असून, 'बंटोगे तो कटोगे...' या घोषणा हिंदूंकडून दिल्या जात आहेत.
रविवारी खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरात केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वतः पुढे येऊन या घटनेचा निषेध केला. ट्रूडो म्हणाले, मंदिरात हिंसाचाराच्या घटना अस्वीकार्य आहेत. प्रत्येक कॅनेडियन नागरिकाला मुक्तपणे आणि सुरक्षितपणे त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी तातडीने कारवाई केल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागाचे आभार मानले.
दरम्यान, या घटनेमुळे कॅनडातील हिंदूंमध्ये संताप वाढत आहे. या घटनेविरोधात ब्रॅम्प्टन मंदिराच्या पुजाऱ्याने सर्व हिंदूंना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी मंदिराबाहेर 'बंटोगे तो कटोगे...' अशा घोषणा दिल्या.ब्रॅम्प्टन मंदिराचे पुजारी म्हणाले की, आता कॅनडातील सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. एकजूट राहिली तर सुरक्षित राहाल. हा हल्ला केवळ हिंदू सभेवरच नाही, तर जगभरातील हिंदूंवर आहे. आज आपण एकत्र येण्याची गरज आहे. आपण फक्त स्वतःचाच नाही तर भविष्याचाही विचार केला पाहिजे. आमचा कोणाला विरोध नाही, पण आम्हाला कुणी विरोध केला तर शांत बसणार नाही, असे ते म्हणाले.
पोलिसांच्या भूमिकेवर संशयविशेष म्हणजे, खलिस्तानी समर्थकांनी ज्यावेळी ब्रॅम्प्टनमधील मंदिरावर हल्ला केला, त्यावेळी पोलिसांनी या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या हिंदूंवरच हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ब्रॅम्प्टनमध्ये जे काही घडले त्यामुळे तेथील राजकीय वर्तुळातही घबराट निर्माण झाली आहे. कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी या हल्ल्याचा निषेध केला.