नवी दिल्ली : नेपाळच्या गधीमाई उत्सवामध्ये जनावरांचा बळी देण्याच्या ३०० वर्षे जुन्या प्रथेवर बंदी घालण्यात आली असून यामुळे लाखो मुक्या जिवांचे प्राण वाचणार आहेत. दर पाच वर्षांनी होणारा हा उत्सव पशुहत्येचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो. गधीमाई मंदिर विश्वस्त मंडळाने मंगळवारी पशुहत्येवर बंदीचा निर्णय घोषित करून सर्व भाविकांना सोबत जनावरे न आणण्याचे आवाहन केले. आम्ही पशुहत्येची प्रथा थांबविण्याच्या औपचारिक निर्णयाची घोषणा करत आहोत. तुमच्या सहकार्याने २०१९चा महोत्सव रक्तपातापासून मुक्त ठेवू. त्याचप्रमाणे हा महोत्सव पशुहत्येचा नव्हे, तर जीवनाचा उत्सव ठरावा यासाठी प्रयत्न करू, असे मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र शाह यांनी एका निवेदनात म्हटले आहे. लोक अनेक पिढ्यांपासून चांगल्या आयुष्यासाठी आई गधीमाईला पशुंचा बळी देत आले आहेत; परंतु ही प्राचीन परंपरा बदलण्याची वेळ आली आहे. हत्या व हिंसाचाराऐवजी शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. प्राणिहक्क संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या संघटना गधीमाई उत्सवातील पशुहत्येविरुद्ध लढा देत होत्या. दयाभावाचा हा सर्वात मोठा विजय असून यामुळे अगणित प्राण्यांचे प्राण वाचणार आहेत. मंदिर समितीच्या या निर्णयाची आम्ही प्रशंसा करतो; परंतु लोकांना ही बाब समजून सांगण्याची फार मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याची आम्हाला जाणीव आहे. पशूंचा बळी देण्याची रीत ही आम्हाला मागे नेणारी असून आधुनिक जगातील एकाही देशाने या रितीला थारा देऊ नये, असे अॅनिमल वेलफेअर नेटवर्क नेपाळचे संस्थापक सदस्य व गधीमाई उत्सवाविरुद्ध आवाज उठविणारे मनोज गौतम यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)