भाजपाच्या दोन नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे इस्लामिक देशांकडून संताप व्यक्त होत आहे. काही देशांनी तर भारतीय राजदूतांना याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी बोलावून घेतलं तर काही देशांमध्ये भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचीही मागणी होत आहे. याच तणावाच्या काळात इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन आमिर अबदुल्लाह बुधवारी रात्री उशिरा भारत दौऱ्यावर आले आहेत.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यावेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या भेटीत प्रेषित अवमान प्रकरणाचा मुद्दा देखील चर्चेचा भाग ठरला. डोवाल यांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जारी केलेल्या निवेदनातून काही ओळी काढून टाकल्या आहेत.
इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाह बुधवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटींमध्ये व्यापार, वाहतूक आणि दहशतवाद हा मुख्य मुद्दा होता असं सांगण्यात येत आहे.
आमिर अब्दुल्ला आणि डोवाल यांच्या भेटीतील चर्चेबाबत जे निवेदन इराणकडून जाहीर करण्यात आलं होतं. ज्यात प्रेषित अवमानामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला होता. संबंधित उल्लेख असलेल्या ओळी निवेदनातून आता काढून टाकण्यात आल्या आहेत. याच निवेदनात अजित डोवाल यांनी दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असंही नमूद केलं होतं.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलं उत्तरभारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवेक्त अरिंदम बागची यांना पत्रकार परिषदेत याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी प्रेषित अवमान प्रकरणावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. पण ज्या निवदेनाचा तुम्ही उल्लेख करत आहात ते आता हटविण्यात आलं आहे असं ते म्हणाले. तसंच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत प्रेषित मोहम्मद संदर्भात वादग्रस्त विधानाचा मुद्दा चर्चेत नव्हता असंही ते म्हणाले.