स्टॉकहोम : मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडनचे व्यंगचित्रकार लार्स विल्क्स (Lars Vilks) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यापूर्वी ते दोनवेळा अपघातातून वाचले होते. 14 वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. दोनदा ते हल्ल्यातून वाचले होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. (Swedish cartoonist Lars Vilks dies in car accident)
रविवारी पोलीस संरक्षणात पोलिसांच्या कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली. यामध्ये विल्क्स यांचा मृत्यू झाला. विल्क्स यांच्यासह पोलीस वाहनात असणाऱ्या दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या क्रोनोबर्गमध्ये हा अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लार्स यांनी 2007 मध्ये मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र त्यांनी काढले होते. यामुळे त्यांच्यावर दोनवेळा हल्ले झाले होते. 2011 मध्ये एका व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला होता. त्याला 2014 मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली होती. यानंतर 2015 मध्ये दुसरा हल्ला झाला होता.
फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते. रविवारी झालेल्या दुर्घटनेकडे सध्यातरी अपघाताच्या नजरेने पाहिले जात आहे. तरीदेखील पोलीस घातपाताच्या दिशेने चौकशी करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीचा वेग खूप जास्त होता.
एका व्यक्तीने स्थानिक मीडियाला सांगितले की, असे वाटले की पोलिसांच्या गाडीचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावरील दुसऱ्या बाजुला समोरून येणाऱ्या गाडीवर जाऊन आदळली. मोठ्या आवाजानंतर दोन्ही गाड्यांना आग लागली.