- संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना भारताने हवाई हल्ले करून नष्ट केल्यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली व बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला. तो भारताने मोडून काढल्यानंतर मात्र, पाकिस्तानने युद्धाच्या दिशेने जाण्याचे धाडस दाखविण्याऐवजी पंतप्रधान इमरान खान यांनीच चर्चेची तयारी दाखविली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, पाकिस्तानचा पाठीराखा चीनने जैश-ए-महंमदवरील कारवाईसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जारी केलेल्या निवेदनावर स्वाक्षरी केली. शिवाय पाकिस्तान ज्या मुस्लीम देशांवर विसंबून होता, त्यांनीही त्याला शांतता राखण्याचे आवाहन करीत दहशतवाद प्रशिक्षणाचे तळ नष्ट करावेत, असे सुनावले.
फ्रान्स सतत पाकिस्तानला दहशतवादी तळ नष्ट करण्याचा सल्ला देत आला आहे. आता ऑस्ट्रेलियानेही तोच इशारा दिला आहे. अशा स्थितीत युद्ध झाल्यास आपणास भारताच्या कारवाईला सामोरे जावे लागेल आणि मदतीला कोणीच येणार नाही, असे पाकिस्तानच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी चर्चेची आणि शांततेची भाषा सुरू केली आहे.
मुस्लीम देशांचे महासंघटन ओआयसीने (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन), ५० वर्षांनंतर इतिहासात प्रथमच भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना विशेष पाहुण्या या नात्याने ओआयसीच्या कार्यवाहीत सहभागी होण्यासाठी नामंत्रित केले आहे. हा पाकिस्तानला मोठा झटका आहे, कारण तो ओआयसीचा संस्थापक सदस्य आहे. ओआयसीच्या सदस्य देशांनी म्हटले की, भारतात कोट्यवधी मुसलमान अल्पसंख्याक असूनही त्यांना बहुसंख्यांकांसारखे अधिकार आहेत. तेथे त्यांच्याशी कोणताही भेदभाव होत नाही. भारताने जागतिक शांततेसाठी सतत कार्य केले आहे. या घडामोडींमुळे ओआयसीतील मुस्लीम देशही पाकिस्तानला मदत करतील, असे दिसत नाही. पाकिस्तानच्या रणनीतीला यामुळे मोठा फटका बसला आहे.
यानंतर, पाकिस्तानला याची जाणीव झाली की, भारताशी आपण युद्ध केले वा झाले, तर मुस्लीम देश आपल्यासोबत क्वचितच उभे राहतील. भारतच नव्हे, तर पाकिस्तानचे शेजारी सगळे देशही त्याच्या अतिरेक्यांना आश्रय देण्याच्या धोरणावर नाराज आहेत. यात इराण आणि अफगाणिस्तानचाही समावेश आहे. इराणने म्हटले आहे की, आमच्या देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे फक्त पाकिस्तानच आहे. अफगाणिस्तानही तेथील अस्थिरतेमागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या पाकिस्तानच्या धोरणामुळेच मुस्लीम देश त्याच्यापासून दूर जात आहेत.हा अधिकारी म्हणाला की, भारताच्या जागतिक पातळीवरील बळकट बनलेल्या राजकीय स्थितीमुळेही पाकिस्तानला वेगळे पाडण्यात खूप मदत झाली आहे.
सौदी अरबचा पाठिंबा मिळणे अवघडपाकिस्तानचा सगळ्यात मोठा सहानुभूतीदार देश सौदी अरब आहे. त्याचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यात २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा इरादाही व्यक्त केला होता, परंतु त्यानंतर ते भारतात आले. त्यांनी दहशतवादाचा निषेधही केला. त्यांनी भारतात पाकिस्तानच्या तुलनेत फार मोठ्या (१०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त) गुंतवणुकीची घोषणाही केली. यामुळे सौदीकडून आपणास युद्ध परिस्थितीत मदत मिळणे अवघड असल्याचे पाकिस्तानच्या लक्षात आले.