नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत निर्माण झालेला कर संघर्ष शमविण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले असून, आगामी ७ ते ८ वर्षांत अमेरिकेकडून १ हजार नागरी विमाने खरेदी करण्याचा, तसेच तेल व गॅसची खरेदी वाढविण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव अमेरिकी वाणिज्य मंत्र्यांसमोर ठेवला.अमेरिकेने भारताच्या पोलाद व अॅल्युमिनियमवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेच्या २९ वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन्ही देशांत निर्माण झालेला व्यापारी संघर्ष शांत करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असे सूत्रांनी सांगितले.भारताने दिलेल्या अधिकृत प्रस्तावावर अमेरिकी व्यापार प्रतिनिधी मार्क लिन्स्कॉट हे रविवारी नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ६ जुलै रोजी वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेव आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. वॉशिंग्टनमधील या चर्चेपूर्वीच या मुद्यावर काही तरी तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले.भारताने अमेरिकेपुढे मांडलेल्या हिशेबानुसार, भारताकडून अमेरिकेला दरवर्षी विमान खरेदीपोटी ५ अब्ज डॉलर आणि तेल व गॅसच्या खरेदीपोटी ४ अब्ज डॉलर मिळत राहातील. ही रक्कम संरक्षण खरेदीच्या व्यतिरिक्त आहे.
अमेरिकेकडून १ हजार विमाने, तेल व गॅस खरेदीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 4:43 AM