आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये सुरू झालेला हिंसाचार शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतरही थांबलेला नाही. दरम्यान, या आंदोलकांनी देशात सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक जमावाकडून हिंदूंना वेचून वेचून लक्ष्य केलं जात आहे. काहींच्या घरांची जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काहींची दुकानं लुटण्यात आळी आहेत. यादरम्यान, मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये दंगेखोरांनी तोडफोड करून मंदिराला आग लावली.
बांगलादेशमधील डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याकडील मौल्यवान सामानाची लुटमार करण्यात आली. एका वृत्तानुसार लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये हिंदूंच्या धार्मिक कार्यांशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरामध्ये तोडफोड करून लुटालूट करण्यात आली.
आंदोलक दंगेखोरांनी नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांचे कॉम्प्युटर दुकान नासधूस करून लुटले. कालिगंज उपजिल्ह्यातील चंद्रपूर गावामध्ये चार हिंदू कुटुंबांच्या घरांना लक्ष्य करून लुटण्यात आले. तर हातिबंधा उपजिल्ह्यातील पुरबो सरदुबी गावामध्ये १२ हिंदूंच्या घरांमध्ये आग लावण्यात आली.
त्याशिवाय पंचगड येथेही अनेक हिंदूंच्या घरांमध्ये तोडफोड करून लुटालूट करण्यात आली. ओइक्या परिषदेचे सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ यांनी सांगितले की, हिंदूंना लक्ष्य करून हल्ले झाले नाहीत, असा एकही जिल्हा उरलेला नाही. आमच्याकडे वेगवेगळ्या भागातून सातत्याने हल्ल्यांची माहिती येत आहे.