वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये ‘स्टे अॅट होम’चे आदेश देण्यात आले आहेत. सर्व बाजारपेठा, व्यवसाय ठप्प आहे. त्या विरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलन करण्यात येत असून, पुन्हा व्यसायकेंद्र सुरू करण्याची मागणी आंदोलक करीत आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जगभरात कसोशीने सोशल डिस्टन्सिंग राखण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. असे असूनही तेथील अनेक राज्यात आंदोलन जोर पकडत आहे. मिशिगनमध्ये ‘स्टे अॅट होम’विरोधात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. केनटुकीमध्ये शकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. प्रत्येकजण सहा फूट अंतरावर थांबला होता. सोशल डिस्टन्सिंग पाळतो, मात्र व्यवहार सुरू करावेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. ओहिओतील स्टेट हाऊस बाहेर आंदोलकांनी अमेरिकन ध्वज आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची टोपी परिधान केली होती.उटाहमध्ये वॉशिंग्टन काऊन्टी बाहेर उद्योगधंदे सुरू करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नॉर्थ कॅरोलनामधे स्टे अॅट होम झुगारून रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. व्हर्जिनियातील कॅपिटल स्क्वेअर येथे नागरिकांनी आंदोलन केले. लॉकडाऊनमुळे लाखो नागरिकांना रोजगार गमवावा लागला आाहे. गेल्या आठवड्यात ५५ लाख नागरिकांनी बेरोजगार विम्यासाठी अर्ज दाखल केला आहे.