मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्मीरमध्ये जनता पाकिस्तानी सरकारच्या अत्याचाराविरोधात एकवटली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष उफाळून आल्यानंतर POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी याठिकाणी मोठ्या संख्येने काश्मीरी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले. लोकांच्या विरोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ताकदीचा वापर केला. पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचेही समोर आले आहे.
पाकिस्तान सरकारने केलेल्या करवाढीविरोधात लोकांनी ११ मे रोजी आंदोलनाची हाक दिली होती. त्यासाठी नियोजन करण्यात येत होते. तत्पूर्वी पाकिस्तान सरकारने अतिरिक्त सुरक्षा दल बोलावून लोकांना ताब्यात घेणे सुरू केले. त्यामुळे लोकांमध्ये रोष वाढला. कुठल्याही अटक वॉरंटशिवाय पाकिस्तानात मीरपूर जिल्ह्यातील ७० लोकांना अटक केली. त्यानंतर संतापलेल्या जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. काही ठिकाणी सुरक्षा जवान आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. एनआयए रिपोर्टनुसार या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पाकिस्तानात आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी हिंसेचा आधार घेतला जात आहे. प्रशासनाने अतिरिक्त कुमक मागवली आहे. ज्यात पाकिस्तानी रेंजर्स आणि फ्रंटियर कोअरच्या जवानांचा समावेश आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार, काश्मीरात ज्वाइंट अवामी एक्शन कमिटीने लॉन्ग मार्चची घोषणा केली होती. हा मोर्चा रोखण्यासाठी ७० जणांना ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानी मुलांनाही सोडलं नाही. हवेत धुरांच्या नळकांड्या सोडल्याने अनेकजण जखमी झाल्याचं पुढे आले.
पाकिस्तानात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणेविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. याठिकाणी एक किलो दळण ८०० पाकिस्तानी रुपये झाले आहे. महागाईने लोक त्रस्त आहेत. त्यात करवाढीमुळे अनेक मालाच्या किंमती वाढल्या. त्यामुळे लोकांचा राग वाढला. पीओकेमधील सर्वात मोठा पक्ष यूनाइटेड काश्मीर पीपुल्स नॅशनल पार्टीने अटक केलेल्या लोकांवरून प्रश्नचिन्ह उभे केलेत. पोलीस आणि लष्कर मिळून लोकांवर लाठीचार्ज करतंय. या घटनांची दखल संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.