इस्लामाबाद - पाकिस्तानातील सत्ताबदलानंतर आता इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने देशातील सर्व विधानसभांचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात नॅशनल असेंब्लीपासून होणार आहे. पीटीआयचे वरिष्ठ नेते फवाद चौधरी यांनी या निर्णयाची माहिती दिली. येत्या काही महिन्यांत आम्ही नव्याने निवडणुकांकडे वळू, असेही ते म्हणाले.
सरकार कोसळल्यानंतर PTIचा मोठा निर्णय -पाकिस्तानातील इम्रान सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी PTI ने ही घोषणा केली आहे. पीटीआयचे इतर अनेक नेते आणि अधिकारी यांच्यासह इस्लामाबाद येथे माध्यमांशी बोलताना फवाद चौधरी म्हणाले, 'बनी गाला' येथे इम्रान खान यांच्यासोबत पीटीआयच्या सेंट्रल कोअर एक्झिक्युटिव्ह कमिटीची (सीईसी) बैठक झाली. यावेळी एकूण परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले.
सीईसीची इम्रान यांच्याकडे शिफासर - चौधरी म्हणाले, पीटीआयने नॅशनल असेंब्लीपासून सुरू होणाऱ्या विधानसभेचे राजीनामे देऊन टाकायला हवेत, अशी शिफासर सीईसीने खान यांच्याकडे केली होती. तसेच, शेहबाज शरीफ यांच्या उमेदवारी अर्जावरील आमचे आक्षेप दूर झाले नाही, तर आम्ही उद्या राजीनामा देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
फवाद यांचा शाहबाज यांच्यावर हल्लाबोल - पीटीआयने पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी उमेदवारी दिली आहे. तर शाहबाज यांच्यावर हल्लाबोल करताना फवाद म्हणाले, "शाहबाज ज्या दिवशी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी होणार आहेत, त्याच दिवशी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणारआहेत, हा देशाचा मोठा अपमान आहे." खरे तर, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे विशेष न्यायाल (सेंट्रल- I) सोमवारी म्हणजेच 11 एप्रिलला 14 अब्ज रुपयांच्य मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शाहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांना आरोपी ठरवू शकते.