लक्झेमबर्ग : प्रदुषणाशी लढण्य़ासाठी युरोपमधील लक्झेमबर्ग या देशामध्ये पुढील उन्हाळ्यापर्यंत सार्वजनिक परिवाहन सेवा मोफत करण्यात आली आहे. यामुळे नागरिक खासगी कार सोडून सरकारी बसमधून प्रवास करण्यास प्राधान्य देतील अशी आशा तेथील नव्या पंतप्रधानांना आहे. असे करणारा लक्झेमबर्ग हा जगातील पहिलाच देश बनला आहे. याचबरोबर भांगेची खरेदी-विक्री आणि साठवणूकही कायदेशीर करण्यात आली आहे.
लक्जेमबर्गमध्ये प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या जटील बनत चालली आहे. यामुळे नागरिकांना सरकारी बस, ट्रेन आणि ट्राममधून प्रवास करण्यासाठी एकही पैसा न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला प्रदुषण आणि वाहतूक कोंडीपासून वाचविण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना अवलंबत आहे.
बुधवारी झेविअर बेटल यांनी लक्झेमबर्गच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बेटल यांनी सोशलिस्ट वर्कर्स पार्टी आणि ग्रीन पार्टी यांच्या सोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. बेटल यांनी प्रचारावेळीच पब्लिक ट्रान्सपोर्ट मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. बेटल यांनी भांगेची खरेदी-विक्री आणि साठवणूकही कायदेशीर करण्यात आली आहे. यामुळे यापुढे नागरिकांना भांगेच्या खरेदी-विक्री प्रकरणी अटक केली जाणार नाही. तसेच काही सुट्याही जाहीर केल्या आहेत.
लक्झेमबर्ग या शहरामध्ये वाहतूक व्यवस्थेला जगातील सर्वात खराब वाहतूक म्हणून ओळखले जाते. एक लाख 10 हजार लोकसंख्येच्या या शहरामध्ये चार लाख लोक कामासाठी येतात. यापैकी शेजारील देशांतून दोन लाख लोक येतात.