दुबई, दि. 21 - माणूस कितीही दूर असला तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी लोकमतचे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून लोकमतच्या पाठीवर कौतुकाची थाप ठोकली. नोकरी-व्यवसायानिमित्त देश आणि गाव सोडलेली लाखो माणसे सध्या दुबईमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उंच रोवत आहेत. दुबईतील व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल यांच्या नेतृत्वात दुबईमध्ये स्थिरावलेल्या मराठीजनांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. लोकमतचा चमू दुबई भेटीवर आल्याचे कळताच ह.भ.प. अॅड. जयवंतराव बोधले महाराज यांच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी एकमेकांशी संपर्क साधून लोकमत चमू आणि दुबईतील मराठीजन एकत्र आले. यानिमित्त शुक्ल यांच्या दुबईतील कार्यालयाच्या सभागृहात १८ सप्टेंबरच्या सायंकाळी एक स्नेहसोहळा पार पडला. या समारंभात पुन्हा मराठी माती भावनांनी पुलकित झाली आणि आठवणींच्या सुगंधाने दरवळली.लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट वसंत आवारे यांच्यासह वरिष्ठ उपसंपादक गोपालकृष्ण मांडवकर, बार्शीचे तालुका प्रतिनिधी शहाजी फुरडे तथा व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल, दासबोध अभ्यास वर्गाचे प्रमुख डॉ. निमखेडकर, इ.वाय.चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तथा महाराष्ट मंडळ दुबईचे अध्यक्ष राहुल गोखले, एसक्यूसीचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर तथा गल्फ महाराष्ट बिझिनेस फर्मचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना राजा माने यांनी दुबईत स्थिरावूनही आपली संस्कृती जपत महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मराठीजनांचे आपल्या मनोगतातून स्वागत केले. ते म्हणाले, सातासमुद्रापारही आपल्या संस्कृतीचा झेंडा उंच राखत मराठी माणसांची मान ताठ ठेवणारी ही सर्व कर्तबगार मंडळी ख-या अर्थाने महाराष्ट्राचे ब्रॅण्ड अम्बेसॅडर आहेत. दुबईसारख्या प्रगत शहरात राहूनही तिथे आपले मराठीपण जपत मराठी मनाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी ही मंडळी करीत असलेल्या प्रयत्नांचे माने यांनी कौतुक केले. लोकमतच्या वतीने चालविल्या जाणा-या सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी आपल्या मनोगतातून कल्पना दिली.लोकमतचे व्हाईस प्रेसिडेंट वसंत आवारे म्हणाले, लोकमत हा महाराष्टाचा मानबिंदू आहे, तसे येथील दुबईकरही महाराष्टाचे मानबिंदू आहेत. आपल्या कर्तबगारीच्या बळावर दुबईतील समाजकारणात, व्यापारात आणि अर्थकारणात अधोरेखित व्हावे, असे त्यांचे कार्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही या कर्तबगारांचा अभिमान आहे. लोकमतच्या वतीने काढल्या जाणा-या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. एक लाख प्रतींच्या खपाचा विक्रम नोंदविणारे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हातून मिळालेला लोकमतचा दीपोत्सव म्हणजे महाराष्टच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्हॅल्यूचे प्रोजेक्ट्स आणि बिझिनेस डायरेक्टर व्ही. एम. राऊत, मोवार्ड एनर्जीचे ग्रुप फायनान्स को-आर्डिनेटर अजय भांगे, फेम्को इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट मॅनेजर संदीप गुप्ता, अभी इंप्टेक इंटरनॅशनलचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर नितीन सास्तकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दुबईतील मराठीजनांकडून ‘लोकमत’च्या पाठीवर थाप, दीपोत्सवाच्या विक्रमाचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 8:46 PM