वॉशिंग्टन : पाकिस्तानने तत्काळ सर्व दहशतवादी संघटनांना अभय देत पोसणे थांबवावे, असा कडक संदेश देत, अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार केला.सर्व दहशतवादी संघटनांचा उद्देश अनानोंदी, हिंसाचार आणि दहशतीचे बीजारोप करणे आहे. तेव्हा पाकिस्तानने आपल्या भूमीतील दहशतवादी कारवाया चालविणाऱ्या सर्व दहशतवादी संघटनांना गोंजरणे आणि आश्रय देणे त्वरित थांबवावे, असे आवाहन व्हाइट हाउसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी केले.दहशतवादी हल्ल्याने दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका आणि भारतादरम्यान सहकार्य आणि भागीदारीचा आमचा संकल्प आणखी दृढ होतो. या अघोरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुुटुंबीय, भारत सरकार आणि भारतीय जनतेप्रती आम्ही अतीव दु:ख व्यक्त करतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रसिद्धी सचिव सँडर्स यांनी म्हटले आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निर्धाराने मुकाबला करण्यात अमेरिका भारत सरकारसोबत आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.अमेरिकेच्या विदेश विभागाचे उप-प्रवक्ते रॉबर्ट पलाडीनो यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. दहशतवादांना सुरक्षित अभय आणि पाठिंबा देऊ नये, तसेच संयुक्त राष्टÑाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावासंदर्भातही आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आमचे सर्व देशांना आवाहन आहे.आयएसआयवर संशय कायमहल्ल्याच्या म्होरक्यांच्या पाठिशी पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्थाच असावी, असा दाट संशय दक्षिण आशियाशी संबंधित अमेरिकी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून जैश आणि अन्य दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला राजी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसते.जैशने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने, या हल्ल्यातील आयएसआयच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे सीआयएचे माजी विश्लेषक ब्रूस रिडले यांनी म्हटले आहे. ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटमधील विचारवंत रिडले यांनी पुढे असा इशाराही दिला की, या हल्ल्याची पाळेमुळे पाकिस्तानात दिसतात. तेव्हा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी हे मोठे आव्हान असेल.आमचा हल्ल्याशी संबंध नाही : पाकया हल्ल्याचा निषेध करताना या हल्ल्याशी आमचा अजिबात संबंध नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. जगात कोठेही हिंसा झाली, तरी पाकिस्तान त्याचा निषेधच करतो, पण भारतीय प्रसारमाध्यमे व सरकारमधील काही जण या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते आरोप चुकीचे व खोडसाळ आहेत.
Pulwama Attack: दहशतवादी संघटनांना अभय देणे थांबवा; अमेरिकेचा पाकिस्तानला सज्जड इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 5:50 AM