आता अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध नव्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्क्यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देत चीनने अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के एवढा टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.
10 एप्रिलपासून लागू होणार नवे टॅरिफ -यासंदर्भात बोलताना चीनच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकन वस्तू्ंवर लावण्यात आलेले हे अतिरिक्त टॅरिफ १० एप्रिलपासून लागू होईल. यापूर्वी चीनने अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के टॅरिफ लावण्यासंदर्भात भाष्य केले होते. मात्र आता ते वाढून ८४ टक्के करण्यात आले आहे. याशिवाय, चीनच्या वाणिज्य मंत्रालयानेही १२ अमेरिकन संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत टाकले आहे. याशिवाय, 6 अमेरिकन कंपन्यांना "अविश्वसनीय संस्थां"च्या यादीत समाविष्ट केले आहे.
अमेरिकन स्टॉक मार्केटवरही परिणाम - या घोषणेनंतर, यूएस स्टॉक इंडेक्स फ्युचर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे. तत्पूर्वी, ट्रम्प प्रशासनाने काल चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १०४ टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. हे शुल्क ९ एप्रिल (बुधवार) पासून लागू होईल, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीने म्हटले होते.
व्यापार युद्ध आणखी तीव्र - चीन आणि अमेरिका यांच्यातील हे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध आता आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध "टीट-फॉर-टॅट" धोरण अवलंबले आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत आहे.